पुणे : "अलीकडं व्यंगचित्रांमधून व्यक्त होणं कठीण झालं आहे. नेते आणि भक्तगण एखादं व्यंगचित्र कसं स्वीकारतील याबाबत अंदाज बांधता येत नाही. एका मर्यादेनंतर व्यंगचित्रं माझ्यापुढं काय आव्हानं ठेवतील, असा प्रश्न मला पडायचा. मात्र सृजनाच्या पातळीवर व्यंगचित्र आजही मला आव्हान देतं. मनाच्या आणि शरीराच्या आरोग्यासाठी कला आवश्यक आहे. 'हंस'च्या अंतरकरांनी माझ्यातील व्यंगचित्रकार हेरला होता आणि त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळं या कलेकडं मी गांभीर्यानं पाहू लागलो. आपल्याला कोणतेही वलय किंवा नाव नसताना एखादा संपादक सृजनशील व्यंगचित्रकलेची आबाळ करू नकोस, असा सल्ला देतो. त्यावेळी आपण गांभीर्यानं विचार करणं भाग असतं, असं ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस म्हणाले. 29 जुलै २०२५ ला शि. द. फडणीस वयाची शंभर वर्षे पूर्ण करत आहेत. या निमित्तानं 'शि. द. 100' हा तीन दिवसांचा भव्य महोत्सव होणार असून यानिमित्त ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्याबरोबर शनिवारी पत्रकारांचा विशेष संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.